देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हळूहळू मंदावत आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १ लाख २७ हजार ९५२ नवे रुग्ण आढळून आले. तर १,०५९ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात २ लाख ३० हजार ८१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात कोरोनाचे १३ लाख ३१ हजार ६४८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिटी रेट ७.९८ टक्क्यांवर आला आहे. देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा ५ लाख १ हजार ११४ वर पोहोचला आहे.
याआधीच्या दिवशी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत १३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती. गुरूवारी १ लाख ४९ हजार ३९४ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, १ हजार ७२ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, २ लाख ४६ हजार ६७४ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. बुधवारी देशात १ लाख ७२ हजार ४३३ कोरोनाबाधितांची भर पडली होती. या तुलनेत गुरूवारी दैनंदिन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आली. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९५.३९ टक्क्यांवर पोहचला. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर ९.२७ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर १२.०३ टक्के नोंदवण्यात आला होता.