महावितरण कंपनीचे भोसे येथील शाखा सहायक अभियंता गणेश वगरे हे आत्महत्येची चिठ्ठी लिहून परिवारासह गेल्या 24 तासांपासून बेपत्ता झाले आहेत. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पंढरपूर पोलिसांत बेपत्ताची नोंद झाली असून, पोलिस शोध घेत आहेत.याबाबत त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, प्रहार अपंग संघटनेच्या पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथील एका पदाधिकार्याने मला नाहक त्रास दिला. या त्रासाला व बदनामीला वैतागून मी आत्महत्या करीत आहे. ही चिठ्ठी लिहून ते गुरुवारी (दि. 3) सायंकाळी सात वाजल्यापासून पत्नी आणि दोन मुलींसह गायब झाले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील महावितरण कंपनीच्या शाखा कार्यालयामध्ये गणेश वगरे यांच्याकडे सहाय्यक अभियंता म्हणून ऑक्टोबर 2021 पासून महावितरण शाखा कार्यालय, भोसे येथील रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.पटवर्धन कुरोली येथील रहिवाशी व प्रहार अपंग क्रांती संघटनेचे एक पदाधिकारी व त्याचा भाऊ त्यांचे कधीही बिल न भरलेले घरगुती वीज कनेक्शन घोडके वायरमन यांनी कट केल्याचा राग मनात धरून वायरमन घोडके आणि गणेश वगरे यांच्याविरुद्ध प्रहार संघटनेच्या नावाने आरोप केले होते.