Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशमहागाई पुन्हा येणार, पुन्हा येणार खाद्यान्न, औषधे, सौंदर्य प्रसाधने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे पुन्हा...

महागाई पुन्हा येणार, पुन्हा येणार खाद्यान्न, औषधे, सौंदर्य प्रसाधने, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे पुन्हा होणार महाग

ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी दुमत असले तरी देशात महागाईची (Inflation) तिसरी लाट येणार हे नक्की. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात (FM On Union Budget) महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले. आरबीआय गव्हर्नरनी पतधोरणाचा (Credit Policy) आढावा घेत विकास दर वाढीचा जोम दाखवला. पण देशातील वाढत्या महागाईला कुठलीही लस लागू पडत नाहीये. तेल, साबण, मांजनपासून ते रोजच्या वस्तूंपर्यंत सर्वच वस्तूंचे दर गेल्या तीन महिन्यांत दोनदा वाढले आहेत. नोव्हेंबर आणि जानेवारीत दोन वेळा किंमत वाढवल्यानंतर एफएमसीजी(FMCG), हेल्थकेअर, ब्युटी प्रॉडक्ट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या पुन्हा किंमतीत वाढ करण्याच्या तयारीत आहेत. कच्चा माल महाग झाल्याने आणि नफ्यावर होणारा ताण निवळण्यासाठी दरवाढीचा उपाय, ग्राहकांचे मात्र दिवाळे काढत आहे. प्रत्येक क्षेत्रातील उत्पादकांनी 3 ते 10 टक्क्यांनी उत्पादने आणि वस्तू महाग केल्या आहेत.

उन्हाळ्यात कूलर एसीचे भाव घाम काढणार कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष एरिक ब्रागान्झा म्हणतात की, उत्पादनांच्या किंमतीत वाढ झाली असली तरी ही वाढ सणासुदीच्या दिवसांत पुढे ढकलण्यात आली होती. सणासुदीत मागणीला धक्का लागू नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. पण आता इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग जास्त काळ तग धरू शकत नाहीत. त्यामुळे यंदाच्या तिमाहीत किंमतीत 5% वाढ होईल. म्हणजेच उन्हाळा येण्यापूर्वी कुलर आणि एसीची बाजारपेठ ग्राहकांचा घाम काढणार आहे. ओरिएंट इलेक्ट्रिकचे बिझनेस हेड सलील कपूर यांच्या दाव्यानुसार, प्लास्टिक, स्टील आणि कॉपरच्या किंमती वाढल्या आहेत, त्यामुळे कंपनी आपल्या सर्व उत्पादनांच्या किंमती 4-7 टक्क्यांनी वाढवणार आहेत.

बिस्किटे, मीठ, तेल, साबण बनविणाऱ्या एफएमजीसी कंपन्याही दरवाढीच्या पंक्तीत येऊन बसल्या आहेत. ब्रिटानिया चौथ्यांदा किंमत वाढवण्याची तयारी करत आहे. मार्चपर्यंत कंपनी किंमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. साखर, गहू, पामतेल यासारखा आवश्यक माल महाग झाला असून, परिणामी सक्तीने दरवाढ करावी लागणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत (Q1 fiscal YY 21-22) 1%, दुसऱ्या तिमाहीत 4% आणि तिसऱ्या तिमाहीत 8% ने किंमतीत वाढ केली आहे. म्हणजेच दर तिमाहीला दरवाढीने सीमोल्लंघन केले आहे.

एफएमसीजी कंपन्यांच्या नफ्यात खंड पडत असल्याने कंपन्यांनी दरवाढीचे शस्त्र पाजळले आहे. एकतर मालाला हवा तसा उठाव मिळत नसल्याने उत्पन्नाच्या तुटवड्यामुळे मागणीवर परिणाम झाला आहे. डाबर इंडियाचे मुख्य कार्यकारी (CEO)अधिकारी मोहित मल्होत्रा यांनी सांगितले की, “महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी कंपनीने सर्व उत्पादनांच्या स्तरावर किंमती वाढवल्या आहेत.” कंपनीने हनीटस, पुदिन ग्रीन आणि च्यवनप्राश यांच्या किंमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. आता कंपनी पुन्हा एकदा किंमती वाढवणार आहे.

सौंदर्य प्रसाधने उत्पादन कंपन्यांनी ही महागाईची हाळी पिटली आहे. जगातील सर्वात मोठी ब्युटी प्रॉडक्ट कंपनी लॉरियलसाठी पेट्रोकेमिकल्सशी संबंधित कच्च्या मालाची भाववाढ ही डोकेदुखी ठरली आहे. वाढत्या महागाईची झळ ही मोठी चिंता असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी अगोदरच भाववाढ झाली होती. आता लगेच या वर्षाच्या मध्यान्ह पर्यंत दरवाढीची दुसरी फेरी पूर्ण होईल, असे लॉरियल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अमित जैन यांनी सांगितले. कंपनी 5 ते 6 टक्क्यांनी किंमत वाढवू शकते असा अंदाज आहे. म्हणजे खाणं-पिणं, सजवणं आणि सजावट करणं, स्वयंपाक करणं सगळं काही महागाईच्या फेऱ्यात अडकणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -