बंद कारमध्ये अचानक स्फोट झाल्याने त्यातील नग्न प्रेमी युगुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.13) सायंकाळी औरंगाबाद शहरालगत असलेल्या गांधेली शिवारात घडली आहे. ही कार शहरातील एका बिल्डरची असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप मृतांची ओळख पटली नसून कारमधील एसीमुळे स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
औरंगाबाद शहरालगत असलेल्या गांधेली शिवारात सहारा सिटीचे काम सुरु आहे. या प्रोजेक्टच्या पाठिमागे असलेल्या मोकळ्या जागेत एक कार बेवारस आढळून आली होती. कारची पाहणी केली असता त्यामध्ये आक्षेपार्ह स्थितीत प्रेमी युगुल मृतावस्थेत आढळून आले. दोघांची वय चाळीस वर्षापर्यंत असावीत. अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. कारच्या सर्व काचा असल्याने त्यातील एसीमुळे स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच चिखलठाणा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह घाटी हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवले. कार शहरातील एका बिल्डरची असल्याची माहिती समोर येत असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.