ताजी बातमी ऑनलाइन टीम
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सातत्याने यशाची नवीन शिखरे पादाक्रांत करत आहे. विराट कोहलीने टी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. नंतर त्याला वनडेच्या कर्णधारपदावरूनही काढून टाकण्यात आले. त्यामुळे रोहितकडे टी-२० आणि वनडे संघाच्या नियमित कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दोन टी २० मालिका आणि एक वनडे मालिका खेळली आहे आणि तिन्ही मालिकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा क्लीन स्वीप झाला आहे. यामध्ये नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध (टी २०) ३-० ने आणि वेस्ट इंडिजविरुद्ध (वनडे आणि टी २०) ३-० या मालिका विजयांचा समावेश आहे.
कर्णधार बनल्यानंतर रोहितने सातत्याने नवीन खेळाडूंना संधी दिली आणि त्याने टीम इंडियाचे बस्तान बसवले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत अष्टपैलू व्यंकटेश अय्यरची (Venkatesh Iyer) कामगिरी काही खास नव्हती, पण तरीही रोहित त्याला संधी देत राहिला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत तर व्यंकटेश मॅच विनर म्हणून उदयास आला. त्याने विंडीजविरुद्धच्या शेवटच्या टी-२०मध्ये जबरदस्त फलंदाजी केली. तर गोलंदाजी करताना किरॉन पोलार्ड आणि जेसन होल्डरसारखे दोन बळीही मिळवले.
व्यंकटेश मोठे फटके मारण्यात माहिर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी २० मालिकेत व्यंकटेश (Venkatesh Iyer) हा भारताचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने तीन सामन्यांत ९२ च्या सरासरीने आणि १८४ च्या स्ट्राईक रेटने ९२ धावा केल्या. शेवटच्या टी २० मध्ये त्याने सूर्यकुमार यादवसोबत ३७ चेंडूत ९१ धावांची भागीदारी करून भारताला १८४ धावांपर्यंत नेले. व्यंकटेश मोठे फटके मारण्यात माहिर आहे. त्याने आयपीएल २०२१ मध्येच आपल्या क्षमतेची सर्वांना जाणीव करून दिली आहे.
हार्दिक पंड्याच्या जागी व्यंकटेश संघात..
या वर्षी ऑस्ट्रेलियात होऊ घातलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी व्यंकटेश अय्यरची वाटचाल महत्त्वाची आहे. कांगारुंच्या भूमीवर भारताला वेगवान गोलंदाजी करणा-या अष्टपैलू खेळाडूची गरज भासणार आहे. व्यंकटेश यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पंड्याची कामगिरी निशाराशाजन राहिली. या जागतिक स्पर्धेनंतर बीसीसीआयनेही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. पण त्याचवेळी व्यंकटेश हा टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग असेल याकडे निवडकर्त्यांनी लक्ष दिल्याचेही बोलले जात आहे. त्यातच व्यकटेशही निवडकर्त्यांच्या विश्वासास पात्र ठरला आहे.