ताजी बातमी ऑनलाईन अर्ज
महिला हेड कॉन्स्टेबल आणि तिच्या पतीचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हरियाणातील फरिदाबादमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. सेक्टर-31 येथील पोलीस लाईनमधील घरी हे दाम्पत्य मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून तपास सुरु केला आहे. ही घटना घडली त्यावेळी त्यांचा 11 वर्षांचा मुलगा घरी नव्हता. परीक्षेसाठी तो शाळेत गेला होता, मात्र घरी येऊन पाहिल्यानंतर त्याला आई-वडील मृतावस्थेत दिसल्याने त्याला मोठा धक्का बसला.
हेड कॉन्स्टेबल सरोज गेल्या काही दिवसांपासून फरिदाबाद शहरातील सेक्टर-31 येथील पोलिस लाईन्समध्ये राहत होत्या. पती आणि मुलगा अशा कुटुंबासह त्या घरात राहत होत्या. एनआयटी पोलिस ठाण्यात त्या हेड कॉन्स्टेबल पदावर तैनात होत्या.
बलवंत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस लाईनमध्ये राहणारी महिला हेड कॉन्स्टेबल सरोज यांची हत्या झाली आहे. तर त्यांच्या पतीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर हत्येमागची कारणे समोर येतील, असं पोलिसांनी सांगितलं.
महिला हेड कॉन्स्टेबलच्या नातेवाईकांच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. ते ज्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार देतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. सरोज यांना 11 वर्षांचा मुलगा आहे. सरोज यांचा खून झाला त्या दिवशी तो परीक्षा देण्यासाठी गेला होता. मात्र घरी परत आल्यावर त्याने आपले आई-वडील या जगात नसल्याचं समजलं.