रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यूक्रेनवर हल्ल्याची घोषणा करताच रशियन सैन्याने युक्रेनवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रात तणाव निर्माण झाला होता. आता या वादाचे रुपांतर युद्धात झाले आहे. रशियाने युक्रेनवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. या युद्धाचे भारतीयांना टेन्शन आले आहे. अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहे. भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी मोहिम सुरू केली आहे. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
युक्रेनमध्ये सुमारे 20000 भारतीय नागरिक असून त्यांना भारत सरकारने लवकरात लवकर भारतात परतण्याचे आवाहन केले आहे. तर 24 आणि 26 फेब्रुवारीलाही युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना भारतात आणण्यासाठी एअर इंडियाची विमाने उड्डाण करणार आहेत. एअर इंडियाने यापूर्वी कधीही युक्रेनला उड्डाण केले नव्हते. मात्र, संकटात सापडलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यत अनेक विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्यात आले आहे. मात्र, शेकडो विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत.
दुसरीकडे, युक्रेनमधील युद्ध परिस्थितीमुळे विमान तिकीट महागले आहे. त्यामुळे मेडिकलच्या शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. युक्रेनमध्ये सर्वाधिक बिहारी विद्यार्थ्यी आहेत. अनेकांना मायदेशी परतायचे आहे, पण विमान तिकिटांचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. तिकीट मिळवण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. रशियाने युक्रेनवर युद्ध केल्याच्या बातम्या झळकल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.