आयपीयल 2022 चे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र मुंबई आणि पुण्यात साखळी सामने खेळवले जाऊ शकतात, असे मानले जात आहे. या अंतर्गत, आयपीएल 2022 चे लीग सामने मुंबईतील वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडियम तसेच पुण्यातील MCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित केले जाऊ शकतात. पण बीसीसीआयसमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईत सामना होणार असताना मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमवर खेळावे लागणार आहे. त्यामुळे बाकी फ्रँचायझी या चिंतेत आहेत की, वानखेडे हे त्यांचे घरचे मैदान असल्याने त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. अनेक फ्रँचायझींना विश्वास आहे की, मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानाचा फायदा मिळेल आणि उर्वरित संघांना न्याय मिळणार नाही. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचे सामने काही फ्रँचायझींना सोयीचे वाटत नाहीत.
आयपीएल फ्रँचायझींनी मुंबई इंडियन्सला स्पर्धेदरम्यान मिळणाऱ्या फायद्याबाबत त्यांच्या तक्रारी मांडल्या आहेत. फ्रँचायझी सूत्रांचा हवाला देत टाईम्स ऑफ इंडियाने लिहिले आहे की, “इतर कोणत्याही संघाला घरच्या मैदानावर सामने खेळायला मिळणार नाहीत. मुंबई इंडियन्सने आपले बहुतांश सामने वानखेडेवर खेळले तर ते चुकीचे ठरेल. हे मैदान वर्षानुवर्षे त्यांचा बालेकिल्ला आहे. फ्रँचायझींनी ही चिंता व्यक्त केली आहे. मुंबई इंडियन्सने त्यांचे बहुतांश सामने डी.वाय.पाटील आणि पुण्यात खेळले तर त्याची कोणत्याही फ्रँचायझीला अडचण नसेल. ब्रेबॉर्न स्टेडियमही ठीक आहे. बीसीसीआय या प्रकरणात लक्ष घालेल अशी आशा आहे.
गेल्या मोसमात भारतात आयपीएल खेळवण्यात आले तेव्हा बीसीसीआयने निर्णय घेतला होता की कोणताही संघ त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार नाही. फ्रँचायझी याच्या बाजूने आहेत. सामन्यांचे वाटप कसे करायचे याचा अंतिम निर्णय सध्या बीसीसीआयला घ्यायचा आहे. बीसीसीआयसमोर 10 संघांच्या सराव स्थळांचाही प्रश्न आहे. तीन मैदानांव्यतिरिक्त नवी मुंबईतील रिलायन्स क्रिकेट स्टेडियम आणि वांद्रे कुर्ला स्टेडियमचे पर्याय बीसीसीआयसमोर आहेत.
याआधी आयपीएल 2022 मध्ये 70 लीग सामने होणार असल्याची बातमी होती. त्यापैकी 55 मुंबईत आणि 15 पुण्यात होणार आहेत. कोरोनामुळे मुंबईतच सामने आयोजित करण्याची योजना आहे. अहमदाबादमध्ये बाद फेरीचे सामने होणार असल्याची बातमी आहे. 26 किंवा 27 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होऊ शकते. तसेच स्पर्धेचा अंतिम सामना मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणार आहे.