केंद्र सरकारचे अधिकारी असल्याचे सांगून 10 लाखांची खंडणी मागणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खंडणीसाठी चक्क जेएसडब्ल्यूच्या अधिकाऱ्याला धमकावलेही. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
भारत सरकार अशी पाटी गाडीवर लावून फिरणाऱ्या आणि जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकावणारे गणेश तुकाराम पोळ (रा. चेंबूर ), जीवन शामराव महापुरे (रा. कोल्हापूर) , महेंद्र पांडुरंग बनसोडे (रा. डेरवली, पनवेल) आणि मुरलीधर वसंत पाटील (रा. बहिरीचा पाडा, अलिबाग) यांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या या चौघांना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी एक व्यक्ती भारत सरकारची राजमुद्रा असलेल्या लेटरपॅडवर कंपनीतील बेकायदेशीर व्यवहार तसेच मानकुळे खाडीत सुरू असलेल्या उत्खननासंदर्भात चौकशी अर्ज घेवून कंपनीत आला. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास हे चौघे आरोपी कंपनीत आले आणि सहायक व्यवस्थापक मंगेशकुमार थत्ते यांच्याकडे चौकशी करू लागले. केंद्र सरकारमधील वरीष्ठ अधिकारी असल्याचे भासवत कंपनी बंद करण्याची धमकी दिली. 10 लाख रूपये देवून प्रकरण मिटव नाहीतर मारून धरमतर खाडीत फेकून देईन , अशी धमकी दिली.
थत्ते यांनी याबाबत वरिष्ठांना कळवले. त्यानंतर कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेकडून त्यांची चौकशी आणि तपासणी सुरू झाल्यानंतर त्यांची पाचावर धारण बसली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून वडखळ पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चौकशी केली असता ते कुणीही सरकारी अधिकारी नसून भामटे खंडणीखोर असल्याचे लक्षात आले. त्यांचयाविरोधात वडखळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या चौघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
त्यांच्याकडे भारत सरकारची राजमुद्रा असलेले लेटरपॅड, ओळखपत्र सापडली. तसेच ते वापरत असलेल्या गाडीवर भारत सरकार अशी अक्षरे असलेली पाटी असून त्यावर राजमुद्रा आहे. वडखळ पोलीस आता पुढील तपास करीत आहेत.