Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रचार वर्षात पावणे दोन लाख किलो प्लास्टिक जप्त, 5 कोटींची वसुली; BMCची...

चार वर्षात पावणे दोन लाख किलो प्लास्टिक जप्त, 5 कोटींची वसुली; BMCची मोठी कारवाई

मुंबईत प्लास्टिक बंदी असतानाही प्लास्टिकचा सर्रास वापर करणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेने कठोर कारवाई केली आहे. प्रत‍िबंधित प्‍लास्टिकचा वापर नागरिकांनी करू नये, यासाठी महानगरपालिकेद्वारे नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येते. तसेच प्रत‍िबंधित प्‍लास्टिकचा वापर करत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. यानुसार जून 2018 ते जानेवारी 2022 या सुमारे 20 महिन्यांच्या कालावधीत महापालिकेने विविध ठिकाणी करून 1 लाख 75 हजार 428 किलो प्लास्टिक जप्त केले आहे. तसेच बंदी असतानाही प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून महापालिकेने 5 कोटी 36 लाख 85 हजार इतका दंड वसूल केला आहे. या अनुषंगाने अधिक चांगल्या पर्यावरणासाठी मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने करण्यात येत असलेल्या विविध स्तरीय कार्यवाहीचा भाग म्हणून ‘प्रतिबधित प्लास्टिक’ विरोधी कारवाई आता अधिक प्रभावी करण्यात येत असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारने 23 मार्च 2018मध्ये अधिसूचना काढून प्लास्टिक वापरण्यास बंदी घातली होती. या अंतर्गत प्रतिबंधित प्‍लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (हॅण्‍डल असलेल्या व नसलेल्या), प्‍लास्टिकपासून बनविण्यात येणार्‍या व एकदाच वापरल्या जाणार्‍या टाकाऊ वस्तू जसे की ताट, कप, ताटल्या (प्लेट), पेले (ग्लास), चमचे इत्‍यादी वापरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्‍या प्रतिबंधित प्‍लास्टिकच्या वस्तू, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप किंवा पाऊच व सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्‍यादी साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी प्रतिबंधित प्‍लास्टिकच्या वापरावर बंदी घातलेली आहे. तरीही मुंबईत अनेक दुकानदार, फेरिवाले आणि नागरिकांकडे प्लास्टिकच्या पिशव्या सापडल्याने महापालिकेने ही कारवाई केली आहे.

प्लास्टिकचा वापर करू नका
प्रतिबंधित प्‍लास्टिक आढळल्यास, प्रथम गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये, दुसर्‍या गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये, तिसर्‍या गुन्ह्यासाठी 25 हजार रुपये दंड व 3 महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे. त्यामुळे सर्व नागरिक, व्‍यापारी, फेरीवाले व सर्व संबंधितांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर करु नये. जेणेकरुन, महानगरपालिकेला रुपये 5 हजार ते रुपये 25 हजार पर्यंतची दंडात्मक कारवाई सारखी अप्रिय कारवाई टाळता येईल, असं आवाहन पालिकेने केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -