राज्यात मोठ्या प्रमाणात परीक्षांमध्ये घोटाळे उघडकीस आले आहेत. टीईटी, आरोग्य विभाग भरती, एमआयडीसी भरती, म्हाडा भरती इत्यांदी परीक्षांमध्ये पेपर फोडण्याचे तसेच अन्य गैरव्यवहार करणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याचे दिसून येत आहे. ज्या आरोपींनी आरोग्य भरतीचा महाघोटाळा केला त्यातील अनेक आरोपी आता म्हाडा पेपरफुटीप्रकरणातही सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलीस तपासानंतर औरंगाबादच्या क्लासचालकांना अटक करण्यात आली आहे.
आरोग्य भरती परीक्षा गट ‘क’ व ‘ड’च्या परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी औरंगाबाद येथील अकॅडमी चालक अजय चव्हाण, कृष्णा जाधव, अंकित चनखोर यांना अटक करण्यात आली होती.
पोलीस तपासादरम्यान सदर तिघांचा म्हाडा भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणात ही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित तीन क्लासचालकांसह राजेंद्र पांडुरंग सानप (रा.बीड) याला पुणे सायबर गुन्हे शाखेने अटक केली.
न्यायालयाने चारही आरोपींना 22 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने (वय-47) यांनी पोलीसांकडे फिर्याद दाखल केलेली असून आतापर्यंत याप्रकरणात एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे.