भविष्यात शिवसेना – भाजप एकत्र येणार नाही. एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही. ज्या पद्धतीनं 25 वर्ष एकत्र काम केलं. ते विसरुन भाजप सूडानं वागतंय. त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी नागपुरात मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केलं. त्यामुळे आगामी काळात शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून युतीच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे. तसेच शिवसेनेची आगामी वाटचाल काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीसोबतच होणार असल्याचेही संकेत मिळत आहेत. भाजपचा भगवा आहे की नाही? भगव्याचा दांडा फक्त आमचाच आहे. भाजपचा आहे की नाही माहित नाही, असा चिमटाही राऊत यांनी काढला. तसेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना नेते संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना पूर्णविरामही दिला. जीना यांनी एक फाळणी केली तुम्ही रोज फाळणी करता, असा टोला लगावतानाच एमआयएमशी आघाडी होणार नाही. हे सांगणारा मी पहिला माणूस आहे. एमआयएमने उत्तर प्रदेशात भाजपची बी टीम म्हणून काम केलं. त्यामुळे समाजवादी पार्टीचं मोठं नुकसान झालं. मतांची आकडेवारी पाहिल्यावर एमआयएम कुणासाठी काम करते हे दिसून येतं, असं राऊत म्हणाले.