किरीट सोमय्या हे दापोलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई का होत नाही याची विचारणा करण्यासाठी येत आहेत. त्याला विरोध करणारे हे कोण, तुम्हाला शिवसेनेत जायचे असेल म्हणून तुम्ही हे सगळं करताय का? असा सवाल निलेश राणेंनी संजय कदमांना केला आहे. शनिवारी (दि. २६) रोजी खेड भरणेनाका येथे हॉटेल बिसुमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी निलेश राणे यांनी सोमय्या यांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, दापोलीतून आव्हान देणाऱ्यांना सांगू इच्छितो आव्हानांना आम्ही कधी भीक घातली नाही ही भाषा आमच्या सोबत बोलायची नाही. म्हणून मी स्वतः इथे आलोय.
मी पोलिसांना देखील सांगितलं आहे लॉ अँड ऑर्डर बिघडवायचे काम महाविकास आघाडीची लोक करत आहेत. त्यांचा पोलिसानी अगोदर बंदोबस्त करावा कारण आमच्या अंगावर कोणी आलं तर आम्ही सोडणार नाही. किरीट योमय्या यांचा दौरा यशस्वी होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राणे पुढे म्हणाले, स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या काही समस्या असतील तर त्यांनी सांगायला हवे आपण त्यातून मार्ग काढू. पण हे रिसोर्ट उभारण्यासाठी पैसा आला कुठून? सुरूवात तिथून आहे. स्थानिकांना कोणी डाका टाकून आणून पैसे इथे वापरत असतील तर ते चालेल का, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.
विषय भरकटवू नका, कोणत्याही व्यावसायिकाला घाबरवायची किंवा घाबरायची गरज नाही. हा विषय अनिल परब यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा गैरवापर करून मनी लॉडरिंग करून पैसे आणून व्हाईट केले आणि त्यातून ही प्रॉपर्टी उभी केली विषयाला तिथून सुरवात झाली आहे, असा आरोप यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी केला.