भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या टीकेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी सुजय विखेंना चांगलंच फटकारलं. ज्यांना कुणाला उद्योग नाही ते टीका टिप्पणी करतात. माझी पत्रकारांना (journalist) विनंती आहे की, असल्या गोष्टींना जास्तीचं महत्त्व देण्यापेक्षा उलट तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. मी इथे येऊन तिथल्या तिथे एवढे झटझट निर्णय घेतले. ताबडतोब तीन ते चार सचिवांशी बोलून त्यांना सूचना दिल्या आहेत. त्याला महत्त्व द्या ना, असं अजित पवार म्हणाले. ज्यांना उद्योग नाही त्यांनी आमच्यावर टीका करायची आणि आम्ही त्याला उत्तर द्यायचं. पुन्हा तुम्ही त्यांच्याकडे जायचं, अजित पवार असं म्हणाले, त्याला तुमचं उत्तर काय असं विचारायचं. यातून तुम्ही काय साधणार आहात? आणि मी काय साधणार आहे? राज्यातील जनता काय साधणार आहे? याचाही विचार करा ना, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हानियोजनाच्या बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर मीडियाशी त्यांनी संवाद साधला. यावेळी सुजय विखे पाटील यांच्या टीकेवरील प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सुजय विखेंना फटकारलं. ज्यांनी केलेल्या स्टेटमेंटला गांभीर्याने घेण्याची गरज आहे अशा स्टेटमेंटबद्दल आम्ही उत्तर देऊ. त्यांच्या स्टेमेंटला फार काही महत्त्व द्यायची गरज नाही, अशा शब्दात अजितदादांनी विखेंना फटकारलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवत आहोत. ठाकरे साहेबांची भूमिका महत्त्वाची आहे. आम्ही त्यांना साथ देत आहोत, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या घरी ईडीला एक डायरी सापडली आहे. त्यात मातोश्रीला 50 लाखांची घड्याळ दिल्याचं म्हटलं आहे. त्याबाबत पवार यांना विचारण्यात आलं असता, एजन्सी त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. अशा चौकशा होत असतात. यशवंत जाधव यांनीच याबाबत उत्तर दिलं आहे. मी माझ्या आईला मातोश्री म्हणतो, असं त्यांनी सांगितलं. काही लोकं आपल्या आईला मातोश्री म्हणतात. म्हणतात ना की नाही म्हणत? ते स्वत: म्हणतात त्याला पुन्हा पुन्हा का अधिक उकळी देण्याचं काम करता, असंही अजितदादाद म्हणाले.
सुजय विखे पाटलांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली होती. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको आणि काँग्रेस हे जेवणापुरते वऱ्हाडी असल्याची टीका सुजय विखे यांनी केली होती.