भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावरती मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस (Trombay Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजाच्या दुरुस्तीसाठी बाप-लेकानी 2013-14 मध्ये एक अभियान चालवलं होतं. त्यावेळी पिता-पुत्रांनी नागरिकांकडून मोठा आर्थिक निधी जमा केला होता. बाप-लेकांनी जमा झालेला निधी राज्यपाल यांच्या सचिवाकडे जमा करणे आवश्यक होते. परंतु तो निधी राज्यपाल सचिवांकडे जमा न करता त्यांनी अपहार केला असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही तक्रार एका माजी सैनिकांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलीसांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या यांच्यावरती कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या आज प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
किरीट सोमय्या खूप मोठा घोटाळा केला आहे. त्यांनी आयएनएस विक्रांत या जहाजाच्या दुरूस्तीसाठी 700 बॉक्समध्ये पैसा जमा केला. जमा झालेला पैसा किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी निवडणुकीत वापरला आहे. हे खूप मोठ प्रकरण आहे. काही पैसे त्यांनी पीएमसी बॅंकेच्या माध्यमातून चलनात आणले. किरीट सोमय्यांनी त्यातील काही पैसे त्यांच्या मुलुंडच्या कार्यालयात ठेवले होते. किरीट सोमय्यांनी खूप मोठा घोटाळा केला असल्याने आम्ही आज राज्यभर आंदोलन करू असं संजय राऊत म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना केंद्रीय यंत्रणा टार्गेट करत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच ईडीने आणि आयकर विभागाने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही सगळी प्रकरण किरीट सोमय्यांनी बाहेर काढली आहेत. महाविकास आघाडी हे भ्रष्टाचारी सरकार असल्याची टीका किरीट सोमय्यांनी अनेकदा केली आहे. काल रात्री किरीट सोमय्या यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याने ते आज काय भूमिका मांडतात पाहावे लागेल.