ताजी बातमी ऑनलाईन टीम
येथील बेपत्ता टिंबर व्यापारी दीपक हिरालाल पटेल (वय 34) याचा खून करून मृतदेह राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा येथे पुरून ठेवल्याचे तब्बल अठरा दिवसांनी बुधवारी उघडकीस आले. हा खून 15 लाख रुपयांच्या खंडणीसाठी झाला असल्याची तक्रार देण्यात आली होती; तर पोलिसांनी पैशाच्या प्रकरणातूनच हा खून झाला असावा, असा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने पटेल कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
26 मार्च रोजी दीपक पटेल याचे अपहरण झाल्याची तक्रार हातकणंगले पोलिसांत दाखल झाल्यानंतर तपास यंत्रणेने वेग घेतला. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार, हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी चार पथके तैनात केली होती. राधानगरीसह कोल्हापूर जिल्हा तसेच कर्नाटकच्या काही भागांत पथकांनी तपास केला. परंतु, माग लागला नाही.
15 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकांनी जंग जंग पछाडले होते. पट्टणकोडोली येथे या व्यापार्याची दुचाकी मिळाली होती, तर त्याच्या मोबाईलचे लोकेशन सदलगा (कर्नाटक) येथे मिळाले होते.
फोन एस.टी. बसमध्ये आढळला
अपहरणाच्या दोन दिवसांनंतर दीपकने नातेवाईकांबरोबर संभाषण केले होते. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद होता. दोन दिवसांपूर्वी सोलापूरकडे निघालेल्या एस.टी. बसमध्ये सीटच्या खाली हा मोबाईल लपवण्यात आल्याचे एका जोडप्यास आढळले. त्यांनी हा मोबाईल सुरू केल्यावर यावर दीपकच्या हैदराबादच्या बहिणीचा फोन आला. तिने दीपकविषयी विचारणा करताच संबंधित जोडप्याने हा फोन बसमध्ये सापडल्याचे सांगितले.
त्यानंतर हा फोन हातकणंगले पोलिसांकडे देण्यात आला होता. पोलिसांनी मोबाईलवरील कॉल डिटेल्स आणि लोकेशनद्वारे तपासाची यंत्रणा गतिमान केली.
काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता.