ताजी बातमी ऑनलाइन टीम
काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम जलदगतीने पूर्ण करा – पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामासाठी गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ घ्या, रात्रंदिवस काम सुरु ठेवा, पण हे काम जलदगतीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामाची पाहणी करुन उर्वरीत अपूर्ण कामांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, प्रकल्प अधिकारी राजेंद्र माळी, पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता भाग्यश्री पाटील, प्रकल्प सल्लागार विजय मोहिते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या एकूण कामांपैकी साधारण 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. जॅकवेलचे काम प्रगतीपथावर आहे. जॅकवेलसह उर्वरित अन्य सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी योजनेच्या हेडवर्क्सच्या कामाची पाहणी करुन सद्यस्थितीच्या कामाचा आढावा घेतला. ही योजना मार्गत्वास नेताना येणाया अडचणींचे तात्काळ निराकरण करुन योजना मार्गी लावा, अशा सूचना संबंधित विभागांच्या अधिकायांना त्यांनी केल्या. हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री श्री.पाटील यांनी केली.
आजपर्यंत काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे एकूण 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. जॅकवेलचे काम मे अखेर पूर्ण होण्यासाठी नियोजन करा तसेच त्यानंतर योजनेच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यासाठी नियोजन करावे, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, प्रकल्प अधिकारी व ठेकेदारांसोबत दर आठवडय़ाला बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात येत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल. हर्षजीत घाटगे म्हणाले, प्रकल्पाचे काम गतीने सुरु असून वेळोवेळी भेट देऊन कामाचा आढावा घेण्यात येत आहे.
यावेळी प्रकल्प अभियंता राजेंद्र माळी म्हणाले, हे काम युद्धपातळीवर सुरु असून जॅकवेलचे 25 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर पाण्याच्या टाकीचे काम 97 टक्के झाले आहे. तर या योजनेच्या एकूण 52.97 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याच्या कामापैकी 52 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. महावितरणचे 27 किलोमीटरचे काम मे अखेर पूर्ण होईल, अशी माहिती उपस्थित अधिकायांनी दिली.