कांद्याला कमी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. साधा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने उसनवारीने घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करायची या विवंचनेत असलेल्या खुंटेवाडी ता. देवळा येथील महेंद्र सुरेश भामरे (वय ४२) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील महेंद्र सुरेश भामरे उर्फ गोटू या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन केल्याने त्याचा रविवार (दि. १) रोजी मृत्यू झाला. त्यामुळे शेतकरी वर्गात व्यवस्थेविरुद्ध संतापाची लाट उसळली असून या शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची मदत मिळावी अशी मागणी होत आहे. शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही वसूल होत नसेल तर मग शेतकऱ्याने कसे जगावे असा प्रश्न शेतक-यांनी उपस्थित केला.
महेंद्रने मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा शुक्रवार (दि. २९) रोजी बाजारात विक्रीसाठी नेला. परंतु या चांगल्या दर्जाच्या कांद्याला केवळ आठ रु. प्रतिकिलो भाव मिळाला. ३० क्विंटल ट्रॅक्टरभर कांद्याचे केवळ २४ हजार रुपये झाले. त्यात ट्रॅक्टरभाडे, मजुरी व इतर खर्च यामुळे हातात प्रत्यक्ष कमीच रक्कम राहिली. यामुळे घरबांधणीसाठी घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करायची, घरखर्च कसा भागवायचा असे अनेक प्रश्न निर्माण झाल्याने चिडचिड होत महेंद्रने त्याच दिवशी घरात असलेली कीटकनाशके पिऊन घेतली. हे लक्षात येताच तातडीने त्यास देवळा ग्रामीण रुग्णालय मग मालेगाव आणि नंतर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार चालू केले. पण त्यास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने रविवार (दि. १) रोजी त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चायात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.