अक्षय्य तृतीया हा वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. या दिवशी बुज मुहूर्त असतो म्हणजेच या दिवशी लग्न, मुंडण, गृहप्रवेश, नवीन कार्याची सुरुवात, घर-गाडी खरेदी यांसारखी शुभ कार्ये मुहूर्त न काढता करता येतात. हा दिवस खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो. विशेषतः या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू दीर्घकाळ टिकतात, शुभ परिणाम देतात आणि त्यामध्ये वाढ होते. म्हणून यावर्षी सोने खरेदी करावी की करू नये? असा विचार ज्यांच्या डोक्यात चालू आहे, ही बातमी त्यांच्यासाठीच आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. त्यामुळे आता अनेक कमोडिटी विश्लेषकांनी अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 1.5 टक्क्यांनी घसरून 50,992 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही 1.8 टक्क्यांनी घसरण झाली असून तो 63,200 रुपये प्रतिकिलोवर व्यवहार करत आहे.
आज 3 आठवड्यांपूर्वी सोन्याचे भाव पाहिले असते तर ते अगदी 56,000 रुपयांना टेकलेले होते, आता ते 5000 रुपयांनी कमी झालेले आहेत. तसेच आता लग्नसराई असतानाही भाव जास्त नाहीत, परिणामी ही सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधीच आहे, असे म्हणावे लागेल. डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या भावावरही परिणाम झाला आहे. सोन्याचा भाव मार्चच्या उच्चांकी 55,600 रुपयांवरून झपाट्याने खाली आला आहे.
तृतीयेला बिनधास्त सोनं खरेदी करा; तज्ज्ञांनी दिलाय फायद्याचा सल्ला