रंकाळ्यावर थुकला तर ठोकला, थुकीचंद हाय-हाय, आपला रंकाळा स्वच्छ ठेवा, अशा घोषणा देत रात्री रंकाळाप्रेमींनी मशाल ठोक मोर्चा काढत जनजागृती केली. रंकाळा कोनशिलेवर पिचकारी मारल्याचा व रंकाळ्यावर अस्वच्छता करणाऱ्यांच्या निषेधार्थ रंकाळा संवर्धन व संरक्षण समितीतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले.
राजघाटाजवळ बांधकामाचा इतिहास असलेली कोनशिला आहे. यावर अज्ञाताने पान खाऊन पिचकारी मारली. याबाबत तीव्र संताप व्यक्त झाला. त्याचे वृत्त बुधवारच्या ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यावर आज रंकाळा समितीने टॉवर ते नवनाथ मंदिरपर्यंत चौपाटीवरून ठोक मोर्चा(awareness) काढला. या वेळी रंकाळा समितीचे राजेंद्र पाटील म्हणाले, की ऐतिहासिक रंकाळा परिसरात अस्वच्छता करणाऱ्यांचा बंदोबस्त व्हायला हवा.
वास्तुविशारद जीवन बोडके म्हणाले, “रंकाळ्याचे पर्यावरणदृष्ट्या संवर्धन व्हावे.” अजय कोराणे म्हणाले, की रंकाळ्याच्या सुशोभीकरणाऐवजी रंकाळा संवर्धनाला प्रथम प्राधान्य द्यायला हवे. विकास जाधव म्हणाले, “महापालिका प्रशासनाने पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.” माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव, शाहीर राजू राऊत, राजशेखर तंबाके, किरण पडवळ, धोंडिराम चोपडे, सत्यजित सांगावकर, प्रशांत गडकरी, अमोल गायकवाड, राहुल निल्ले, धनाजी लिंगम, परशुराम नांदवडेकर, ऋषिकेश जाधव, थुकीमुक्त कोल्हापूर अभियानचे ललित गांधी, विजय धर्माधिकारी, दीपा शिपूरकर सहभागी झाले होते. आंदोलनाचे नियोजन रंकाळा समितीचे अभिजित चौगुले, विजय सावंत, यशवंत पाटील, संजय मांगलेकर, सुधीर राऊत, एस. पी. चौगले आदींनी केले.