ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर ; स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाभिषेक समारंभ रविवारी कोल्हापुरात पार पडला. कार्यक्रमासाठी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी एकाच मंचावर उपस्थित होते. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ घेत या दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. ‘आम्ही टी-20 खेळायला आलो होतो असे समजा शेट्टीसाहेब’ असे उत्तर देत पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजू शेट्टींच्या कोपरखळीला उत्तर दिले.
महाविकास आघाडीतील शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात चढाओढ सुरू आहे. यामुळे मित्रपक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी यांनाही याची झळ बसत आहे. सरकार टिकणार की कोसळणार याविषयी अनेकांची वेगवेगळी मते आहेत. अशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेकांची उत्सुकता ताणली आहे.
रविवारी जैन समाजाच्या कार्यक्रमात राजू शेट्टी व जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यातही या सत्तासंघर्षावरून जुगलबंदी रंगली. शेट्टी यांनी त्यांच्या भाषणात पालकमंत्री पाटील यांनी महावीर अध्यासनसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पण ‘ते किती दिवस पालकमंत्री आहेत माहीत नाही’, अशी कोपरखळी मारली.