महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यात हवामान खात्याकडून राज्यात 10 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा तर कोकण विभागामध्ये सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पवासाचा (Rain Alert in Maharashtra) इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांत पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क असून राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या संपर्कात आहे. राज्यातील पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच 15 तुकड्या तैनात केल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीकरिता 9 जुलै 2022 पर्यंत बंद केला आहे व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
कराड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाट येथे दरड कोसळली असून एकेरी वाहतूक सुरु आहे. दरड प्रवण व पूर प्रवण भागातील 136 कुटुंब म्हणजे एकूण 477 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 40 घरांचं कमी प्रमाणात नुकसान तर 2 घरांचं पूर्णतः नुकसान झालं आहे. जिल्ह्यात 2 एनडीआरफ टीम खबरदारी म्हणून तैनात करण्यात आल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 50.2 मिमी पाऊस पडला असून कुठेही पूर परिस्थिती नाही आणि सध्या सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाव वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात 1 एनडीआरफ टीम तैनात करण्यात आली आहे.
पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिथिती सामान्य असून सध्यातरी येथे कुठेही पूर परिस्थिती नाहीये आणि येथील सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहे तर वाहतूकदेखी सुरळीत पद्धतीने चालू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात सरासरी 23.9 मिमी. पाऊस पडला आहे, सध्या पूर परिस्थिती नसून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासांमध्ये 3 फुटांनी वाढ झालीय. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी 32.5 फुट असून इशारा पातळी 39 फुट एवढी आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने झालेली वाढ आणि पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या 15 तुकड्या तैनात: मुंबई (कांजूरमार्ग 1 घाटकोपर 1) -2, पालघर -1, रायगड- महाड- 2, ठाणे-2, रत्नागिरी-चिपळूण -2, कोल्हापूर-2, सातारा-1, सिंधुदुर्ग-1 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण 13 टीम तैनात आहेत. तर नांदेड-1,गडचिरोली-1 अशा दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी 9 तुकड्या: मुंबई -3, पुणे-1, नागपूर-1 अशा एकूण 5 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-2, नागपूर-2 अशा एकूण 4 टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत.