ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुकांना ब्रेक लागला आहे. जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, मुरगूड, वडगाव व कुरूंदवाड या सहा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार होते. मात्र, आता निवडणुका पुढे गेल्याने रणधुमाळी थंडावली आहे.
22 जुलैपासून अर्ज दाखल करता येणार होते. 18 ऑगस्ट रोजी मतदान व 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी, असा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. मात्र, राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम स्थगित केल्याने जिल्ह्यातील सहाही नगरपालिकांच्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत.
या निवडणुका जाहीर झाल्या. मात्र, नगराध्यक्ष निवडीबाबत कोणताच आदेश नव्हता. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, गुरुवारी शिंदे-फडणवीस सरकारने थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राजकीय आघाड्यांवर तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.