ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारतीय महिला क्रिकेट संघ आज (दि. 31) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भिडणार आहे. एजबॅस्टन येथील मैदानावर हा रोमहर्षक सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत पहिला विजय नोंदवायचा आहे. खरेतर दोन्ही संघांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या पहिल्याच सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून तीन गडी राखून पराभव झाला. त्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीतने अर्धशतक झळकावत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. भारताने 20 षटकात 154 धावा केल्या होत्या. त्यानंतर रेणुका सिंगने आपल्या घातक गोलंदाजीच्या जोरावर 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला अडचणीत आणले. तिने पहिले चार फलंदाजांज माघारी धाडले. पण अखेरच्या षटकात भारताला ऑस्ट्रेलियावर दडपण आणता आले नाही आणि ऑस्ट्रेलियाने 6 चेंडू राखून सामना जिंकला.
दरम्यान, पाकिस्तानला शुक्रवारी बार्बाडोसविरुद्ध 15 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाकसाठी भारताविरुद्धचा सामना खूप महत्त्वाचा आहे. मात्र, आकडेवारीवर नजर टाकल्यास भारताचे पारडे जड आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 11 टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 9 भारताने जिंकले आहेत आणि पाकिस्तानने 2 जिंकले आहेत. आजचा सामना सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे. भारतात या सामन्याचे प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्क तसेच SonyLIV अॅप आणि वेबसाइटवर होणार आहे.