महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणारी सुनावणी बुधवारपर्यंत लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने खटले निकाली काढण्यासाठी मोठे खंडपीठ अथवा घटनापीठ स्थापन करण्याचे संकेत गत सुनावणीवेळी दिले होते. ठाकरे आणि शिंदे गटाने एकमेकांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल.
पुढील सुनावणीवेळी शिंदे गटाकडे किती शिवसेना आमदार, खासदार आणि पदाधिकारी आहेत, याची पडताळणी करण्याचे काम पूर्ण करण्याची परवानगी देवून निवडणूक चिन्हाबाबत व मूळ पक्ष कोणाचा, यावर निर्णय घेण्यास मनाई आदेश जारी केला जाण्याची शक्यता आहे. आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत हे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता वादावर निकाल लागेपर्यंत शिवसेनेचे राखीव चिन्ह गोठविण्याची परवानगीही न्यायालयाकडून आयोगाला द्यावी लागण्याची शक्यता आहे.