ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी आज ( दि. ६) दिल्ली विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली. मंत्रिमंडळ विस्तार करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाही, असे सांगतानाच खात्यांची जबाबदारी सचिवांकडे देण्यात आलेली आहे. कोणत्याही खात्याचे काम थांबविलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांची बोलाविलेली बैठक तसेच नीती आयोगाच्या परिषदेत भाग घेण्यासाठी शिंदे हे दिल्लीत आलेले आहेत.
(CM Shinde) महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होऊन एक महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आतापर्यंत केवळ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीच शपथ घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून नव्या सरकारवर टीकेचा भडीमार केला जात आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून, या सुनावणीमुळे देखील मंत्रिमंडळ विस्तार लांबविण्यात आला असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिंदे यांनी शासकीय कामासाठी मी दिल्लीत आलेलो आहे. दिल्ली दौऱ्याचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नाही, असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.