ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडीसह नवरात्रौत्सव काळात शांतता-सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवरील खटले मागे घेण्याची प्रक्रिया राज्यात सुरू झाली आहे. यासंदर्भात आदेशही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. शासन निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 174 सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह 1 हजार 25 कार्यकर्त्यांचे टेन्शन दूर होणार आहे. मात्र न्यायालयाच्या परवानगीनंतरच या निर्णयाचा अंमल होणार आहे.
कोरोना काळात म्हणजे 2019 व 2020 मध्ये सार्वत्रिक मनाई असतानाही कोल्हापूर जिल्ह्यात 24 सार्वजनिक मंडळांच्या 120 कार्यकर्त्यांविरुद्ध वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. 2016 ते 2021 या काळामध्ये जिल्ह्यात भाग 4 व 5 अंतर्गत 89 गुन्हे (626 आरोपी), ध्वनिप्रदूषण 56 गुन्हे (315 आरोपी) व अदखलपात्र 29 गुन्ह्यांत 84 संशयितांचा समावेश आहे. बहुतांशी गुन्ह्यांतील संशयितांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झाले आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने उत्सव काळात राज्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गोविंदा पथकांसह नवरात्रौत्सव काळात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येईल, अशी घोषणा करून प्रत्यक्षात प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवात केली आहे.