गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणीची तारीख लांबणीवर पडत आहे. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी होती. मात्र राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता पुढील सुनावणी ही 27 सप्टेबरला होणार आहे. आता पुन्हा एकदा पुढची तारीख दिल्याने सत्तासंर्घषावर काय निकाल लागणार याची उत्सुकता कायम आहे.
जोपर्यंत चिन्हाचा निर्णय होत नाही तोपर्यंत शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्य बाण हे चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात 27 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देत नाही तोपर्यंत निवडणूक आयोग चिन्हावर निर्णय घेऊ शकतो की नाही हे न्यायालयाने ठरवणार आहे.
पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन
धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला स्थगिती देऊ नये, असा अर्ज 6 सप्टेंबर रोजी मंगळवारी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. त्यावर, आज तातडीने सुनावणी घेण्यात आली होती. सत्ता संघर्ष संदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पाच सदस्यीच घटनापीठ स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये धनंजय चंद्रचूड, एम आर शहा, कृष्ण मुरारी, हिमा कोहली आणि पी नरसिंहा या न्यायमूर्तींचा समावेश आहे. या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली. या घटनापीठाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. आता 27 सप्टेंबरला यावरील सुनावणी होणार आहे.