ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील मुदत संपलेल्या आणि 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत संपुष्टात येणारया बाजार समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्हय़ातील कोल्हापूरसह जयसिंगपूर, गडहिंग्लज बाजार समितीचे बिगुल वाजले आहे. या तीनही बाजार समितींसाठी 29 जानेवारी 2023 रोजी मतदान आणि 30 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकत शेतकरयांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयावर शिंदे-फडणवीस सरकारने युटर्न घेतला असून निवडणुक पुर्वीच्या पद्धतीनुसारच होणार आहेत. त्यामुळे शेतकरी मतदानापासून वंचित राहणार आहे.
निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या निवडणुक कार्यक्रमानुसार आजपासून मतदार यादी तयार करण्याच्या कामास प्रारंभ होणार आहे. 27 सप्टेंबरपर्यंत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सूची मागविण्यात येणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी सदस्य सूची संबंधित बाजार समितींच्या सचिवांकडे सुपूर्द करण्यात येतील. 3 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत प्रारुप मतदार यादी तयार केली जाईल. 1 नोव्हेंबर रोजी सचिव प्रारुप मतदार यादी जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्याकडे सादर करतील. 14 नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 14 ते 23 नोव्हेंबर या काळात मतदार यादीवर आक्षेप व हरकती घेतल्या जातील. 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत आक्षेप, हरकतींवर निर्णय होईल. यानंतर 7 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होईल.