माजलगाव धरणामध्ये मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकलेले कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान राजू मोरे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. आज सकाळपासूनच आपत्ती व्यवस्थापनाकडून जवान मोरे यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. अखेर त्याला यश आले आहे. मृतदेह पाण्यातून बाहेर काढताच परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
नेमके काय घडले बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणामध्ये काल डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ हे पोहायला गेले असता ते पाण्यात बुडाले. २४ तास उलटूनही त्यांचा मृतदेह हाती लागला नाही. डॉ. फपाळ यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी बीड, परळी येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत होते.
आज त्यांच्या मदतीला कोल्हापूर येथील एनडीआरएफची टीम धावून गेली. यावेळी राजू मोरे हे मच्छिमारांनी लावलेल्या जाळ्यात अडकले. त्यांना बाहेर काढताना झालेल्या खेचाखेचीत राजू मोरे यांचा ऑक्सिजन सिलिंडर निसटून वर आला. यात मोरे यांचा मृत्यू झाला. आज सकाळपासून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते.




