एक वेळ आई वडिलांना शिव्या द्या, चालेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना शिव्या दिलेल्या सहन करणार नाही असं वक्तव्य भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात सत्कार समारंभाच्या भाषणात केलं. यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत या विधानावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरकरांची व महाराष्ट्राची तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“आई वरून शिव्या देणे ही आमच्या कोल्हापुरची पद्धत आहे” असे नीच वक्तव्य करुन कोल्हापूरच्या मातीची बदनामी करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुर करांची व महाराष्ट्राची तात्काळ जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि राजू शेट्टी यांची भेट झाली. त्यावेळी शेट्टी म्हणाले की, दादांनी मला संपवलं. ते केंद्रीय नेते माझ्याजवळचे असल्याने शेट्टींना म्हणाले की, दादा कोणाला संपवत नाहीत. दादा… मोदीजी आणि अमित भाईंबद्दल… (वाक्य तोडत) आई-वडिलांना शिव्या द्या, चालेल. ते म्हणतील, जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमच्या कोल्हापूरची पद्धत आहे. पण मोदी अमित भाईंना शिव्या देणं सहन करु शकत नाहीत, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.