कोल्हापूर जिल्ह्यात काल, सोमवार रात्रीपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे.अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. पेठवडगाव परिसरात विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसला. दरम्यान, लाटवडे रोड वर फटाक्याच्या जुन्या शेडवर वीज पडून जमीनदोस्त झाली. यावेळी परिसरातील घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या. तसेच टिव्ही, वीज उपकरणे खराब झाली.
बंडूलाल शिकलगार यांचे फटाक्यांचे जुने गोडाऊन रिकामे होते. यामध्ये टाकाऊ साहित्य ठेवले होते. दरम्यान वडगाव परिसरात आज, सकाळी सव्वा सातच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू होता. यावेळी विजेचा गडगडाट होवून शिकलगार यांच्या जुन्या शेड वर वीज कोसळली. यामध्ये शेड जमीनदोस्त झाले. तर श्रीरामनगर, भूमीनंदन कॉलनी येथील परिसर हादरला. अनेक घरांच्या खिडकीच्या काचा फुटल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महसूल विभागाने घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर पोलिस प्रशासनाने फटाक्याची दुर्घटना समजून झाडाझडती घेतली. दरम्यान शेडमध्ये फटाक्यांचे साहित्य होते की नव्हते याबाबत पोलीस तपास करीत आहेत.