ताजी बातमी ऑनलाईन टीम
दिवाळीच्या तोंडावर जिल्हय़ातील शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे मिळायला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हय़ातील 1 लाख 29 हजार 262 शेतकरी अनुदानास पात्र ठरले आहेत. आधार प्रमाणिकरण केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये तत्काळ अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली. गुरुवारी दिवसभरात 12 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले असून त्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा झाल्याचेही उपनिबंधक शिंदे यांनी सांगितले.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा तत्कालीन महाविक आघाडी सरकारने केली होती. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रोत्साहनचे पैसे जमा होण्यास सुरवात झाली आहे.
जिल्हय़ातील 1 लाख 29 हजार शेतकरी पात्र पीक कर्जाची नियमीत परतफेड करणारया जिल्हयातील 3 लाख 19 हजार 803 शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. शासनाच्या निकषांनुसार पहिल्या टप्प्यात यामधील 1 लाख 29 हजार 264 शेतकरी पात्र ठरले आहेत. तर दूसऱ्या टप्प्यात आणखी 30 ते 40 हजार शेतकरी पात्र ठरतील असा अंदाज आहे.