एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आणि अपक्ष आमदारांनी केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलंच मात्र याशिवाय महाविकास आघाडीतील पक्षांना अनेक धक्केही बसले. आमदारांच्या बंडानंतर ठाकरे गटाच्या खासदारांसह नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटाची वाट धरली. आता कल्याण डोंबिवलीमधूनही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या चार माजी नगरसेवकांसह उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई येथील माननीय मुख्यमंत्री यांच्या शासकीय वर्षा ह्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्वांनी पक्षप्रवेश केला आहे.
योगेश म्हात्रे, पूजा म्हात्रे, दत्ता गिरी, गोरखनाथ जाधव, संजीव ताम्हाणे उपशहर संघटक उद्धव ठाकरे गट, मुकेश भोईर युवासेना तालुका संघटक यांच्यासह शेकडो शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, दीपेश म्हात्रे, राजेश कदम, नवनियुक्त तालुकाप्रमुख महेश पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, विश्वनाथ राणे, सागर जेधे, संतोष चव्हाण आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, ठाकरे गटातील दीपाली सय्यद यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. दीपाली सय्यद बुधवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या. या भेटीआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी आपण स्वीकारणार असल्याचं त्यांनी म्हटलं. मी येत्या तीन दिवसात शिंदे गटात प्रवेश करत असून त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आले आहे, असं दीपाली सय्यद यांनी सांगितलं.