जगावर सध्या मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक दिग्गज कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करत आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी कपातीचे हे सत्र सुरुच आहे. मायक्रोसॉफ्ट (Microsoft), ट्विटर (Twitter) आणि मेटानंतर (Meta) आता ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (Amazon) कर्मचारी कपात करण्याच्या तयारीमध्ये आहे. अॅमेझॉन कंपनीने कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत कंपनीने नवीन भरतीवर देखील बंदी घातली आहे. नोकरीवर टांगती तलवार (Amazon Layoffs) येणार असल्यामुळे अॅमेझॉनमध्ये काम करणारे कर्मचारी चिंतेत आले आहेत.
आर्थिक मंदीमुळे अॅमेझॉन कंपनीने सध्या तोट्यात असलेल्या प्रक्रिया बंद करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच कंपनीने कर्मचारी कपातीचा देखील मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन कंपनीने मागच्या आठवड्यातच हायरिंग फ्रीजची घोषणा केली. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने पाठवलेल्या अंतर्गत मेमोमध्ये असे म्हटले आहे की, कंपनीने गेल्या आठवड्यातच नवीन भरती करणे थांबवले आहे.’ अशामध्ये आता अॅमेझॉनने आपल्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे.
अॅमेझॉन कंपनीमध्ये काम करणारा कर्मचारी जेमी झांगने लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये दावा केला की, कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले आहे. या पोस्टमध्ये संपूर्ण रोबोटिक्स टीमला कामावरुन काढून टाकण्यात आले असाल्याचे त्याने म्हटले होते. LinkedIn च्या डेटानुसार, Amazon च्या रोबोटिक्स टीममध्ये किमान 3766 कर्मचारी आहेत. पोस्टमध्ये जेमी झांगने लिहिले की, आमची संपूर्ण रोबोटिक्स टीम गेली आहे. मात्र, या 3766 कर्मचाऱ्यांपैकी किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले याबाबत अद्याप काहीच अधिकृत माहिती मिळाली नाही.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, ‘अॅमेझॉन कंपनीने आपल्या काही नफा नसलेल्या युनिट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी नोकरी शोधण्याचे निर्देश दिले आहेत. कारण कंपनी लवकरच हे युनिट्स बंद करू शकते किंवा त्यांना स्थगिती देऊ शकते.’ दरम्यान, फेसबुकची मूळ कंपनी मेटाने मागच्या आठवड्यामध्ये आपल्या 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले. ट्वीटर कंपनीने देखील मागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली. तर मायक्रोसॉफ्ट कंपनीने मागच्या महिन्यामध्ये 1000 कर्मचाऱ्यांची कपात केली.