राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं आणि राज्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटलं. त्यात भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानाने आणखी तेल ओतलं गेलं.या विधानांमुळे आता छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले संतापले असून त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.
राज्यपालांच्या विधानाविषयी उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी आज संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेदी दोघांनाही खडे बोल सुनावले आहे. उदयनराजे म्हणाले, ” मी कोश्यारी यांच्या विरोधात नाही. पण अशा प्रवृत्तीच्या विरोधात आहे. हे असंच चालू राहिलं तर ही विकृती निर्माण होईल. यापुढे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा कोणी प्रयत्न केला, तर त्याला निस्तनाभूत करण्याचा विचार आम्ही केला आहे.” त्याचबरोबर उदयनराजेंनी २८ नोव्हेंबरचा अल्टिमेटमही दिला आहे. पुढची वाटचाल काय असेल ते त्यावेळी आपण जाहीर करू. त्रिवेदीची हकालपट्टी झालीच पाहिजे, अशी मागणी करत त्यांनीही माहिती दिली आहे.
राज्यपालांच्या वक्तव्यामुळे उदयनराजे अस्वस्थ झाले असल्याचं आजच्या पत्रकार परिषदेत दिसून आलं. यावेळी त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे आता ते पक्ष सोडणार का, अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत. उदयनराजे म्हणाले, “पंतप्रधान मोदी रायगडवर आले होते. त्यांनी महाराजांना अभिवादन केलं आहे. त्यांनीही या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. आज मी परिवाराचा सदस्य म्हणून बोलतो आहे, पक्ष वगैरे नंतर बघू.”
उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, “मी पक्षात राहणार की नाही, हे सगळं नंतर बघू. पक्ष वगैेरे नंतर आज मी परिवाराचा सदस्य म्हणून बोलतो आहे. माझ्या भूमिकेबद्दल काही गोंधळ नाही. तडजोड करायची असती तर मागेच केली असती. मी भविष्य सांगणारा नाही, पुढे काय होईल ते बघू. निश्चितपक्ष त्या दोघांवर कारवाई करेल.”