दिवसेंदिवस तंत्रज्ञान हायटेक होत आहे. बदलत्या तंत्रज्ञानासोबतच आता आपली सर्वांची लाडकी लालपरी देखील कात टकात आहे. काळाच्या ओघात लालपरीमध्ये अनेक बदल करण्यात आले.प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी कसा होईल यादृष्टीने एसटी बसमध्ये बदल करण्यात आले आहे. मात्र आता याही पुढे जाऊन प्रवाशांच्या सोईसाठी एसटी महामंडळाकडून एक ॲप तयार करण्यात आलं आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना एसटीची अचूक वेळ समजण्यासाठी मदत होणार आहे. एसटी महामंडळाने आता प्रवाशांच्या सुविधेसाठी व्हीटीएस प्रणालीच्या मदतीने एसटी बसची स्थानकावर येण्याची वेळ अचूक समजणारं ॲप तयार केल आहे.
एमएसआरटीसीच्या या ॲपद्वारे प्रवाशाना एसटीच्या ठावठिकाण्याबाबतची सगळी माहिती मिळणार आहे . महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांना या ॲपद्वारे बस किंवा चालक इतर सुविधा याबाबतच्या तक्रारी ही नोंदवता येणार आहेत . एवढेच नव्हे तर या प्रणालीद्वारे रॅश ड्रायव्हिंगचे अलर्ट किंवा गाडी नादुरूस्त झाल्याचे अलर्ट बस आगारात अधिकाऱ्यांना कळणार आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने लालपरी आता आणखी अद्यावत होणार आहे.
प्रवाशांसाठी फायद्याचे तंत्रज्ञान
एसटी महामंडळाकडून तयार करण्यात आलेले हे ॲप प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण यामुळे प्रवाशांना आपली बस कुठे पोहोचली, ती स्थानकात कधीपर्यंत येणार आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. तसेच प्रवाशांना या ॲपद्वारे बस किंवा चालक इतर सुविधा याबाबतच्या तक्रारी ही नोंदवता येणार आहेत . या ॲपच्या माध्यमातून गाडी नादुरूस्त झाल्याचे अलर्ट बस आगारात अधिकाऱ्यांना कळणार असल्यानं तात्काळ प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची सोय करणे शक्य होणार आहे,. यामुळे प्रवाशांच्या वेळेत देखील बचत होणार आहे.