इंडियन प्रीमियर लिग.. अर्थात ‘आयपीएल’च्या पुढील हंगामासाठी (2023) आतापासूनच जोरदार तयारी सुरु झाली आहे. येत्या 23 डिसेंबरला कोच्ची येथे खेळाडूंचे मिनी ऑक्शन होत असून, त्यानंतर संघाची खरी स्थिती समोर येईल. मात्र, त्याआधीच एक मोठी बातमी समोर आलीय. ‘आयपीएल’ अधिक रंजक करण्यासाठी बीसीसीआयने नियमात मोठा बदल केला आहे.
आयपीएलच्या आगामी सीजनमध्ये बीसीसीआय नवे प्रयोग करणार आहे. त्यात एक नवीन नियम लागू केला जाणार आहे. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ असं या नियमाचं नाव आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेत ‘बीसीसीआय’ने हा नियम लागू केला होता. आता तो ‘आयपीएल’मध्येही लागू केला जाणार आहे. आयपीएलच्या टि्वटर हॅंडलवर एका फोटोच्या माध्यमातून हा नियम यावर्षी लागू होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.
काय आहे नियम?
टॉसच्या वेळी दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्या ‘प्लेइंग-11’ सह चार राखीव खेळाडूंची नावे जाहीर करतील. या चार पैकी एका खेळाडूला ‘सब्सटिट्यूट’ म्हणून वापरता येईल. हा खेळाडू दोन्ही इनिंगच्या 14 ओव्हरच्या आत ‘प्लेइंग 11’ मधील कुठल्याही खेळाडूला कधीही ‘रिप्लेस’ करु शकतो. तो पूर्ण बॅटिंग किंवा बाॅलिंगही करु शकेल.
दरम्यान, 14 ओव्हरनंतर मात्र संघात असा बदल करता येणार नाही. तसेच काही कारणांमुळे सामना 10 किंवा त्यापेक्षा कमी षटकांचा झाला, तरी हा नियम लागू होणार नाही. मॅचदरम्यान हा खेळाडू कुठलीही भूमिका निभावू शकत असल्याने संघांचा फायदा होणार आहे.
ऑस्ट्रेलियातील टी-20 बिग बॅश लिगमध्येही हा नियम लागू केला होता. या नियमाला त्यांनी ‘एक्स फॅक्टर’ असं नाव दिलं होतं. या नियमातंर्गत तेथे दोन्ही संघांना 10 ओव्हरच्या आता आपल्या प्लेइंग-11 मध्ये बदल करता येतो.