शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत असल्याची माहिती आहे. बुधवारी दिवसभरामध्ये त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे दोन फोन आले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. राऊत हे सातत्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर भाष्य करत आहेत. यासोबतच राज्यातील सरकार आणि कर्नाटक सरकारवर निशाणा साधत असल्यामुळेच राऊतांना धमकी दिली जातेय अशा चर्चा सुरु आहेत. तसेच शिंदे गटाचे नेते शंभूराजे देसाई यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर राऊतांना हे धमकीचे फओन सुरु झाले असल्याचे देखील बोलले जात आहे. कन्नड रक्षण वेदिका या संघटनेकडून हे फोन येत असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादा चांगलाच पेटला आहे. यामुळे राजकारण देखील तापले आहे. याविषयावरुन संजय राऊतांची तोफ सातत्याने धडाडत आहे. राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन निशाणा देखील साधला होता. सध्याचे सरकार हे नामर्द असल्याची जहरी टिका राऊतांनी केली होती. यानंतर शिंदे गटाचे नेते शंभूराजे देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राऊतांवर निशाणा साधला होता. राऊतांनी सीमावादावर कोणतेही भाष्य करु नये, त्यांना याविषयी काहीच अधिकार नसल्याचे ते म्हणाले होते. तसेच राऊतांनी या विषयावर बोलणे थांबवले नाही तर त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असं देखील शंभूराजे म्हणाले होते. यानंतर पासूनच राऊतांना धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर येत आहे.
सीमावादावरुन राज्य सरकारविषयी काय म्हणाले होते राऊत?
राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य केले होते. त्यांनी शिंदे सरकारला नामर्द सरकार म्हणत शिंदे हे मुख्यमंत्री होण्यास पात्र नाहीत, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे म्हटले होते. ते म्हणाले होते की, दिल्ली दरबार शिंदे सरकारचा वापर करत आहे. तसेच या सरकारला आपल्या महाराष्ट्राच्या जनतेली आणि सीमांची काळजी नाही. अनेक हुतात्म्यांनी रक्ताचे पाणी केले आणि मुंबई आणि महाराष्ट्र मिळवला. मात्र आता सीमा कुरतडल्या जात आहे. असे असुनही हे सरकार षंढासारखं आणि नामर्दासारखं बसलं आहे. हे सरकार नामर्द आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हे सरकारने महाराष्ट्रचं दिल्लीच्या दारामधील पायपुसणं केलं असल्याचंही देखील राऊत म्हणाले होते.