महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाचे पडसाद राज्यात उमटत आहेत. कर्नाटककडून मराठी बांधवाची गळचेपी करण्यात येत असल्याने आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने वाद अधिकच उफाळला आहे. कर्नाटक सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील नेते एकवटले आहेत. महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून 23 डिसेंबरपर्यंत प्रवेश बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
सीमा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश बंदीचा निर्णय घेतला गेला आहे. उद्या महाविकास आघाडीचे कोल्हापुरात आंदोलन होणार आहे. कोल्हापुरातील शाहू समाधीस्थळावर आंदोलन होत आहे. आंदोलनात सीमावासीय मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
कर्नाटक सीमा वादावरुन उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वार पलटवार सुरु झाले आहेत. महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही, नेताच नाही, अशी अवस्था आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली आहे. सीमावादावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतात. मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का बोलत नाहीत? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना केला. तर महाराष्ट्राची एक इंच जागाही कर्नाटकात जाऊ देणार नाही, अशी ग्वाही शिदे यांनी दिली आहे. मात्र, वाद थांबण्याचे नाव घेत नाही.
महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला होता. महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली. यामुळे टोलनाक्यावर वातावरण चिघळले होते. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.
वादानंतर महाराष्ट्राचे मंत्री बेळगावचा दौरा करणार होते. मात्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कोणीही दौरा करु नये, असे स्पष्ट बजावले होते. तसेच पोलिसांनी त्यांना बेळगाव दौरा करण्यास मनाई केली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी आपला दौरा रद्द केला. दरम्यान कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील पाच-ते सहा वाहनांवर दगडफेक केली होती. काही वाहनं पुण्यातील आहेत.