श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्यात लव्ह जिहादचा कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी वाढलेली आहे. त्यातच येत्या अधिवेशनात राज्य सरकार लव्ह जिहाद कायदा महाराष्ट्रात लागू करणार अशाही चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना विचारलं असताना त्यांनी यावर उत्तर देत स्पष्ट बोलणं मात्र टाळलं आहे. आम्ही या कायद्याबाबत पडताळणी करत आहोत मात्र अजून कोणताही निर्णय झाला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यात लव्ह जिहादचा कायदा हिवाळी अधिवेशनात मांडला जाणार असल्याचं बोललं जात आहे, असा सवाल त्याना केला असता फडणवीसांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. यासंदर्भात आम्ही पडताळणी करत आहोत. अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. पण वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे तयार केले आहेत, याचा अभ्यास यानिमित्ताने आम्ही करणार आहोत”, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे हे सुरुवाती पासूनच महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू व्हावा यासाठी आक्रमक भूमिका मांडत आहेत. राज्यातील हिंदू मुलींना सक्षम कायद्याची फार गरज आहे. आज प्रत्येक जिल्ह्यात विविध घटना घडत आहेत. हिंदू मुलींना फसवलं जातं. त्यांना विकण्यापर्यंतची मजल जाते. त्यामुळे महाराष्ट्राता धर्मांतर विरोधी कायदा लागू होणं ही काळाजी गरज आहे असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.