महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नवं ट्विट केलंय.
महाराष्ट्रातील नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडणार नाही. सुप्रीम कोर्टात आमची बाजू मजबूत आहे. कर्नाटक सीमाप्रश्नावर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही असा इशाराही बोम्मबई यांनी दिलाय.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उफाळून आलाय. महाराष्ट्र सरकार यावर आक्रमक भूमिका घेत नसल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
या भेटीनंतर कर्नाटक सीमाप्रश्नावर लवकरच तोडगा काढला जाईल, असं आश्वासन दिलं. त्यानंतर पुन्हा एकदा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला डिवचलं.
बसवराज बोम्मईंचं ट्विट काय?
ट्विटमध्ये बोम्मईंनी लिहिलंय- महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने अमित शहांची भेट घेतल्याने काहीही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापू्र्वीही असा प्रयत्न केला आहे. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. तिथे आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे कर्नाटक सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही, असं ट्विट बोम्मई यांनी केलंय.
बोम्मई यांच्या ट्विटने महाराष्ट्रातील नेत्यांची आणखी आक्रमक प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील भाजप नेते विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपुरात येत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे.