गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आज भाजप आमदारांची बैठक पार पडली. भाजप आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
भाजप आमदार कनू देसाई यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. त्याला उपस्थित आमदारांनी एकमताने मंजुरी दिली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेत भाजप विधीमंडळ गटाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर एकमताने सहमती दर्शवण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर भूपेंद्र पटेल आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्यासह दिल्लीत होणार आहेत. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि बी. एल. संतोष यांची भेट घेऊन त्यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करणार आहेत. त्याशिवाय, गुजरातच्या मंत्रिमंडळाबाबतही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व नव्या मंत्रिमंडळातील नावांवर शिक्कामोर्तब करणार आहे.
शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती
भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी सोहळा 12 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह संसदीय मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
भूपेंद्र पटेल हे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत 20 जण कॅबिनेट मंत्री म्हणूनदेखील शपथ घेण्याची शक्यता आहे.
भाजपचा ऐतिहासिक विजय
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 157 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपच्या या विजयाने काँग्रेसचा 37 वर्ष जुना विक्रमदेखील मोडीत निघाला. काँग्रेसने 1985 च्या निवडणुकीत 149 जागांवर विजय मिळवला होता.