राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये शिवसेना नेमकी कुणाची?
यावरून वाद सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सोपावलं आहे. या पार्श्वभूमीवरच आजपासून धनुष्यबाण नेमका कुणाचा? खरी शिवसेना कुणाची? यावर केंद्रीय निवडणूक आयोगात प्रत्यक्ष युक्तिवादाला सुरूवात होणार आहे.
त्यामुळे उद्यापासून ठाकरे विरुद्ध शिंदे या लढाईचा नवा अंक पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेना आमचीच आहे असा दावा करण्यात आला होता. तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमचीच आहे, असा दावा केला होता. दोन्ही गटांनी धनुष्यबाण या चिन्हावर दावा केल्यामुळे हा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला होता. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपावलं होतं.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना चिन्हाबाबतचे कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धनुष्यबाण चिन्हाबाबतचे कागदपत्र सादर केले. आयोगाने दोन्ही गटाचे कागदपत्र तपासले असून आता धनुष्यबाण चिन्हांबाबत प्रत्यक्ष युक्तिवादाला उद्यापासून सुरूवात होणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून शिंदे आणि ठाकरे गटाने लाखो कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केलेली आहे. ठाकरे गटाकडून आतापर्यंत २२ लाख २४ हजार ९५० शपथपत्रे तर शिंदे गटाकडून तर शिंदे गटाकडून ४ लाख ५७ हजार १२७ पत्र सादर करण्यात आले आहेत.
याशिवास १२ खासदार, ४० आमदार तसेच संस्थात्मक विंगचे सदस्य ७११ आणि स्थानिक संस्थामध्ये २ हजार ४६ लोकप्रतिनिधी आपल्या बाजूने असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग आता प्रत्यक्ष सुनावणीनंतर अंतिम निर्णय काय देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.