सीमाभागातील मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक सरकारकडून बेळगावात भरवण्यात येणार्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे दि.19 रोजी बेळगावात महामेळाव्याचे आयोजन केले आहे. यासाठी महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी उपस्थित राहावे, असे निमंत्रण मध्यवर्ती म. ए. समितीने केले आहे. त्याचबरोबर मराठा संघर्ष समितीचे नेते दिलीप पाटील यांच्याशीही संपर्क साधून उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
उपरोक्त मागणीचे पत्र मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिले आहे.
भाषावार प्रांतरचना झाल्यापासून सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्रात येण्यासाठी सनदशीर मार्गाने झुंज देत आहे. मागील 66 वर्षे विविध मार्गाने आंदोलन पुढे नेण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. यामुळे बिथरलेल्या कर्नाटक सरकारने 2006 पासून बेळगावात अधिवेशन भरवण्यास प्रारंभ केला आहे. यातून बेळगाववर कर्नाटकचा हक्क प्रस्तापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बेळगावमध्ये ज्यावेळी कर्नाटक सरकार अधिवेशन घेते, त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांच्या मेळाव्याचे आयोजन करून महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा प्रकट केली जाते. 2006 मध्ये झालेल्या मेळाव्याला महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील सहभागी झाले होते. सर्व पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शविली होती. तज्ज्ञ समितीचे अध्यक्षपद एन. डी. पाटील यांच्याकडे होते. तेव्हापासून ते समितीच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होत. आजारी असताना आणि मेळाव्यावर बंदी घातलेली असतानादेखील ते हजर राहत. त्याप्रमाणे आपणसुद्धा अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे. आपली जबाबदारी समर्थरित्या पार पाडून सीमाभागाला न्याय मिळवून द्यावा. 19 रोजी होणार्या महामेळाव्याला महाराष्ट्राचे मंत्री, लोकप्रतिनिधीांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मराठा संघर्ष समितीचे दिलीप पाटील यांनी महामेळाव्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे. कर्नाटक सरकारच्या कोणत्याही निर्बंधांना न घाबरता महामेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.