श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला आहे. तिच्या लिव्ह इन पार्टनरने तिची हत्या करुन तब्बल 35 तुकडे केले. श्रद्धाच्या कुटुंबियांना तिने आंतरधर्मीय मुलासोबत राहणे पसंत नसल्याने तिने कुटुंबासोबत संबंध तोडले होते. या घटनेनंतर राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने आंतरधर्मीय-आंतरजातीय विवाहांचा मागोवा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. अशा विवाहांमधील जोडप्यांची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह-कौटुंबिक समन्वय समिती (राज्यस्तरीय) नावाचे एक पॅनेल तयार करण्यात आले आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आणि भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली. आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहानंतर ज्या महिला आपल्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांपासून वेगळ्या राहतात, त्यांच्यावर ही समिती लक्ष ठेवेल. या मुलींच्या कुटुंबियांची माहिती घेऊन त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी समुपदेशन देखील केले जाणार आहे.
या समितीमध्ये 13 सदस्य असतील. या समितीमध्ये महिला व बालविकास विभाग प्रधान सचिव, आयुक्त, सहसचिव, नांदेडचे ॲड. योगेश देशपांडे, औरंगाबादचे संजीव जैन, नाशिकच्या सुजाता जोशी, मुंबईतून ॲड. प्रकाश साळसिंगिकर, नागपूरमधून यदू गौडिया, अकोल्यातून मीराताई कडबे, पुण्यातून शुभदा कामत, मुंबईतून योगिता साळवी, उपायुक्त महिला व बालविकास आयुक्तालय एवढ्या लोकांचा सहभाग असणार आहे.
समितीचे नेमके काम काय?
आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांसाठी ही समिती अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या समिती अंतर्गत नोंदणीकृत विवाह किंवा अनोंदणीकृत विवाह, आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह किंवा पळून जाऊन करण्यात आलेले आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांची संपूर्ण माहिती ठेवली जाणार आहे. असा विवाह करणाऱ्या महिला या त्यांच्या कुटुंबियांच्या किंवा सासरच्या मंडळीच्या संपर्कात आहेत की, नाही याची तपासणी या समिती अंतर्गत केली जाईल. जर त्या संपर्कात नसतील तर त्यांच्या पालकांचा शोध घेतला जाईल आणि त्यांचे समुपदेशन केले जाईल.
श्रद्धा वालकर प्रकरणानंतर सरकार सतर्क
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देशाला हादरवून सोडले. यानंतर आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांचा प्रश्न देखील समोर आला. कारण श्रद्धाच्या कुटुंबियांना तिने आंतरधर्मीय मुलासोबत राहणे किंवा विवाह करणे मान्य नव्हते. यामुळेच श्रद्धाने घर सोडले होते. तसेच तिने कुटुंबियांसोबत आपले संबंध देखील सोडले होते. यानंतर ती दिल्लीमध्ये बॉयफ्रेंड आफताबसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. कुटुंबियांच्या संपर्कात नसल्यामुळे आणि कोणाचाही सपोर्ट नसल्यामुळेच आफताबला कोणाचाही धाक नव्हता. यानंतर असे कोणतेही प्रकरण घडू नये यासाठी आता सरकारने ही समन्वय समिती स्थापन केली आहे.