नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी आली आहे. रिलायन्स उद्योग समूहाचा कारभार हाती घेऊन कंपनीचे अध्यक्ष, मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांना 20 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त अंबानी यांनी ‘जिओ 5G’ नेटवर्कबाबत मोठी घोषणा केली आहे.
प्रत्येक गावात ‘जिओ 5G’
ते म्हणाले, की रिलायन्स टेलिकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली 2023 मध्ये देशभरातील प्रत्येक शहरात, गावात जिओ 5G सुविधा उपलब्ध होईल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युनिक डिजिटल सोल्यूशन प्रदान करण्याची ही संधी आहे.
टेलिकाॅम क्षेत्रात आपलं पहिल्या क्रमांकाचं स्थान आणखी मजबूत केल्याबद्दल मी जिओ टीमचं अभिनंदन करतो. जिओ प्लॅटफॉर्म्सनं आता भारतातील पुढील मोठ्या संधीसाठी सज्ज झालं पाहिजे, असे आवाहन अंबानी यांनी केलं.
जिओ 5G नेटवर्क कमालीचा स्पीड, लोअर लेटन्सी आणि डेटा नेटवर्कला अधिक सक्षम करील. मुलगी ईशाच्या नेतृत्वाखाली रिलायन्सचा रिटेल व्यवसाय झपाट्यानं वाढल्याचा दावाही मुकेश अंबानी यांनी केला.