महात्मा ज्योतीबा फूले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस- मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्यांचा आहे. हे प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे आहे.
सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह रु.6000/- इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणादरम्यान पुस्तके, गणवेश देखील देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती- भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवाराने महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in
या संकेत स्थळावरील नोटीस बोर्डमधील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
अर्ज करण्याचा अंतीम दिनांक 25 जानेवारी 2023 असा आहे. तरी जिल्ह्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.