Monday, May 27, 2024
Homeकोल्हापूरकेएमटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, आजपासून बससेवा पूर्ववत

केएमटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, आजपासून बससेवा पूर्ववत

केएमटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या मागण्या प्रशासनाकडून मान्य करण्यात संप मागे घेण्यात आला. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये दोन गट पडल्याने वादाचे प्रसंग घडल्याचे दिसून आले. त्यामुळे संपात सहभागी न झालेल्या कर्मचाऱ्यांना बसमधून बाहेर ओढण्याचा प्रयत्न झाला. अखेर दिवसभरातील घडामोडीनंतर रात्री संप मागे घेण्यात आला. त्यामुळे केएमटी प्रशासनाला एका दिवसात आठ लाखांचा फटका बसला. दुसरीकडे, नियमित प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पहाटेपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाची घोषणा केली होती. त्यामुळे संपावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाची दिवसभर धावपळ सुरु होती. अखेर सातव्या वेतन आयोगानुसार मागणीचा प्रस्ताव 30 एप्रिलपूर्वी सादर करणे, महाभाई भत्ता 25 टक्के मे महिन्यापासून देणे, सेवा ज्येष्ठतेनुसार सेवा, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोजंदारीवर घेण्याचा प्रस्ताव 15 दिवसांमध्ये प्रशासकांकडे सादर करणे आदी मागण्या मान्य करण्यात संप रात्री मागे घेण्यात आला.

दरम्यान, ठोस लेखी आश्‍वासन न मिळाल्याने म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनने संपाचे हत्यार उपसले होते. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे कर्मचारीही सहभागी झाले. त्यामुळे पहाटेच सर्व कर्मचारी वर्कशॉपच्या गेटवर आले होते. पाठोपाठ अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी व त्यांचे अधिकारीही आले होते. सोबत पोलिस बंदोबस्तही होता. संपात सहभागी न होण्याचे ठरवलेल्या गटाचे प्रमोद पाटील व इर्शाद नायकवडी आल्यानंतर संपाची हाक दिलेल्या सरनाईक यांनी संपात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

यावेळी गवळी यांनी पोलिसांना जे कामावर जाऊ इच्छितात त्यांना संरक्षण द्यावे असे सांगितले. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी निशिकांत सरनाईक यांना कामावर जाऊ इच्छिणाऱ्यांना अडवू नये, तणाव होईल असा प्रकार करू नये असे सांगितले. सरनाईक यांनीही जे संपात सहभागी नाहीत त्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन करू, असे सांगितले. मात्र, सहाच्या सुमारास बस बाहेर जात असतानाच वादाचा प्रसंग घडला.

काही कर्मचारी बससमोर आडवे झोपले. आमच्या अंगावरून बस पुढे न्या असा पवित्रा घेतला. शेवटी पोलिसांनी त्यांना बाजूला केले. साऱ्याच कर्मचाऱ्यांनी चालकाला शिवीगाळ सुरू केल्याने शेवटी तो बसमधून उतरला. कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून सारे चालक संपात सहभागी झाले. दिवसभरात गवळी, उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी चर्चा केल्या, पण अयशस्वी झाल्या. अखेर मागण्या मान्य झाल्यानंतर संप मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -