शुक्रवार पासून आयपीएल 2023 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने धोनीच्या चेन्नई संघाचा पराभव केला. या सामन्यानंतर आता रविवारी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघामध्ये सामना रंगणार आहे. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना पारपडणार असून तो पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तब्बल 2 वर्षांनी आयपीएलचे सामने पुन्हा संघांच्या होम ग्राउंडवर खेळवले जाणार आहेत. रविवारी 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात सामना पारपडणार आहे.
या सामन्याच्या निमित्ताने आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी चाहत्यांनी एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या तिकीट घराबाहेर रात्रीपासून लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सामन्याची तिकीट काढण्यासाठी लोक रात्रभर रांगेत रस्त्यावर बसून आहेत. तर तिकीट काढण्याकरीता आलेल्या लोकांची गर्दी सावरताना स्थानिक पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला.
मुंबई आणि आरसीबीमध्ये हा रोमांचक क्रिकेट सामना पाहण्यासाठी चाहते उत्सुक असून सध्या तिकीट घराबाहेर लागलेल्या लांब रांगांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात 2 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. यासामन्याचे थेट प्रक्षेपण लोकांना ऑनलाईन माध्यमातून जिओ सिनेमावर पाहायला मिळेल. तर टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर याचे थेट प्रक्षेपण होईल.